Category Archives: ताज्या घडामोडी

कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली

नाशिक : संततधार पावसात शनिवारी सकाळी कसारा घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील हा मार्ग असून त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आली आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लवकरच दगड व मातीचा भराव हटवला जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कसारा घाटातील अन्य दोन मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.

मागील काही दिवसांपासून इगतपुरी व कसारा भागात संततधार सुरू आहे. मध्यरात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या घाटातील रेल्वे मार्गावर ही घटना घडली. बोगद्याबाहेर एका रेल्वेमार्गावर दगड आणि मातीचा भराव आल्याचे गस्ती पथकाला लक्षात आले. त्यांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळात रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचे रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही दगड व मातीचा भराव रेल्वे मार्गावर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. कसारा घाटात एकूण तीन रेल्वे मार्ग आहेत. उर्वरित दोन मार्गांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या घाटातील मधल्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे पथक माती हटविण्याचे काम करीत आहे. हे काम झाल्यानंतर रेल्वे मार्गाचे काही नुकसान झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल. नंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.